भंडारा: कोरोनाचं संकट असतानाही सर्व काळजी घेऊन IPLखेळलं जात आहे. पहिल्या टप्प्यातील सामना संपले असून दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. दिल्ली आणि अहमदाबाद इथे सामने खेळवले जात आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आहे. तर लॉकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर पडण्याची बंदी असताना IPLवर सट्टा लावण्याचे प्रकार सुरू होते. भंडारा पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. IPLवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रगती कॉलनी येथे मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएलमधील सामन्यावर सट्टा सुरू असताना साकोली पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केलं असून अद्यापही एक आरोपी फरार आहे.
पंकज हेमराज मूंगुलमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तुमसर येथील बाबा नामक आरोपी फरार झाला आहे. IPLवर या परिसरात सट्टा सुरू असल्य़ाची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी या सट्ट्यावर धाड टाकली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान मोबाइल, टीव्ही, चार्जर असा 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.