BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हटलं आहे. मात्र आता त्यानंतरही नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कुठेही चुकीचं बोललो नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
"पोलीस माझं काय वाकड करू शकत नाही ह्याचा अर्थ मी हिंदूंची बाजू लावून धरतोय. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का? मी कुठेही चुकीचं बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय," असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं.
नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केलं. "विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस वसुलीसाठी वापरले जायचे. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस उद्धव ठाकरेंचे घरगडी म्हनून वापरले जायचे. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकच असतील," असे नितेश राणे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
"छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
"मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे," असे नितेश राणे म्हणाले.