मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाण्यात एका पोलिसाने ऑटो चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रतिबंधक कारवाईच्या नावाखाली एका व्यक्तीस पोलिसाने मारहाण केली. पोलिसाचा हा क्रूर चेहरा पाहून नेटकऱ्यांनीही रोष व्यक्त केला आहे. अखेर या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याची माहिती दिली.
बुलडाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याचा हा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने निर्दयीपणे एका व्यक्तीस मारहाण केली. मारहाण झालेली व्यक्ती ही ऑटो चालक असल्याची माहिती पुढे आली आहे. तर नंदकिशोर तिवारी असे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या नंदकिशोर तिवारीला निलंबित करण्यात आले आहे.
1 मार्च रोजी हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही, म्हणून दोन युवकांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रवाशाने ऑटो चालकाची पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ऑटोचालक आणि प्रवाशाला पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी ऑटोचालकाला बीट जमादार नंदन किशोर तिवारी याने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने ऑटो चालकाला ठाण्याच्या फरशीवर बसवलं आणि त्याच्या पायाच्या तळव्यावर पट्ट्याने मारहाण केली. मारहाणीमुळे पीडित ऑटोचालक वेदनेने ओरडत होता. मात्र पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण सुरुच ठेवली. त्याचवेळी पोलीस तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीशी अधूनमधून बोलत होता. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने ऑटो चालकाच्या कानाखाली मारली.
पोलिसांनी काय सांगितले?
"व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही चौकशी केल्यावर कळालं की, हवालदार तिवारी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी एक तक्रार दाखल झाली होती. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गैरहजर असलेल्या व्यक्तीला तिवारी यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ क्लिपद्वारे आम्हाला कळालं. त्यादृष्टीने आम्ही तात्काळ वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यानुसार तात्काळ पुढील कारवाई करत आहोत," असे तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी सांगितले.