प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी : कोकणात शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पेटणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरीतून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोकणात बंदोबस्त वाढवला आहे. कोल्हापूरच्या भारत बटालीनच्या दोन तुकड्या रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दोन्ही जिल्ह्यात रूट मार्च काढला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. मनाई आदेश हा प्रशासनाने लावला असून कोणताही राजकिय दबाव यात नसल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
दुसरीकडे, जनआशिर्वाद यात्रेवर भाजप ठाम आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन या घटनाक्रमामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेत दोन दिवस खंड पडला होता. मात्र, जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणारं कणकवली शहरही राणेंच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. नारायण राणे यांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. नारायण राणे तिसऱ्या टप्प्यात तीन दिवसाची जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. त्यातील दोन दिवस सिंधुदुर्गमध्ये असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजपचा इरादा आहे.
जन आशीर्वाद कोणत्याही परिस्थितीत निघणारच अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. तसंच शिवसेनेनं जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर शिवसेनेवर टीका केल्यास सिंधुदुर्गात शिवसेना नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा यात्रेला विरोध नव्हता मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर सातत्याने टीका झाल्यामुळे विरोध करत असल्याचं देखील वैभव नाईक यांनी जाहीर केलं आहे.
कोकणात राणे विरुद्ध शिवसेना हा सत्ता संघर्ष कायमच राहिलाय मात्र यावेळी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करून ठाकरे सरकारने थेट राणेंच्या शेपटीवरच पाय ठेवलाय त्यामुळे आता हा संघर्ष किती पेटणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.