मुंबई, परभणी, वाशिम, वर्धा : मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा ( Rain) इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिक, पुणे, अहमदनगरमध्येही पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. (Rainfall forecast in Jalgaon, Dhule, Nandurbar)
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं जिल्ह्यातील शिरपूर, केनवड, चाडस, काटा, कोंडाळ, चिखली, पंगरखेडा परीसरातील शेतशिवारात मोठया प्रमाणात गारपीट झालीय. या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं काढणीला आलेल्या हळद, हरबरा,गहू,टरबूज, ज्वारी, बीजवाई कांदा, मका पिकासह फळबागांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे.
Latest satellite image indicating cloudy weather over south of Vidarbha and adjoining areas.
Please watch for updates from IMD. pic.twitter.com/6Gh05EMJik— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 20, 2021
वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्याच्या देवळी, वर्धा, हिंगणघाट, सेलू, समुद्रपूर, आर्वी आणि कारंजा तालुक्यात पाऊस बरसला. या पावसानं ग्रामीण भागातील गहू,हरभरा, संत्री आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कारंजा तालुक्यातील सावळी इथले शेतकरी रामचंद्र घागरे यांच्या शेतातील संत्रा फळ गळून पडलंय. यात त्यांचं जवळपास 5 ते 6 लाखांचं नुकसान झालंय. या पावसामुळे ग्रामीण भागातल्या तीन तालुक्यातील वीज पुरवठा काहीकाळ खंडित झाला होता.
हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून 18 मार्चला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, मेळघाट परिसरात तुफान गारपीट झाल्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा वादळी पाऊस व गारपीट झाली. यात मुसळधार पावसामुळे काढायला आलेला गहू व काढलेला हरभरा पावसात भिजला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 9 तालुक्याला या वादळी पावसाचा तडाखा बसला. तर पथ्रोड येथे गोठ्यात काम करत असतांना वीज अंगावर पडून अविनाश गोल्हर या 29 वर्षीय शेतकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला.