मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पुणे विभागीतल पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या मार्गादरम्यान दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवारपर्यंत म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
21 फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- पंढरपूर- मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल.
21 फेब्रुवारी रोजी बंगळूरहून सुटणारी गाडी क्रमांक 16505 बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस मिरज- पंढरपूर- कुर्डूवाडी- दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल. ही गाडी सांगली, कऱ्हाड, सातारा येथे येणार नाही.
17 व 18 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ बदलली असून ती दोन तासाने धावणार आहे. गाडीच्या वेळेत बदल केला असून 08.15 ऐवजी 10.15 वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.