विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये (Water Tank) एक श्वान (Dog) मरुन पडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मृत श्वान पाण्याच्या टाकीत पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेले चार दिवस छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar News) नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वमध्ये श्वान मृतावस्थेत आढळला आहे. चार दिवसांपासून मृत श्वान पाण्याच्या व्हॉल्वमध्ये पडून असल्याची माहिती पुढं आली आहे. मृत श्वानामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्वमध्ये दुर्गंधी आणि अळ्याचा खच पडला होता. धक्कादायक बाब म्हणजे लाखो नागरिकांना या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाण्याच्या टाकीत हा सगळा प्रकार घडला आहे.
सापामुळे बंद पडला शहराचा पाणी पुरवठा
काही दिवसांपूर्वी मुलबक पाणी उपलब्ध असून सुद्धा एका सापाने छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. एका सापामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडीच्या पंपहाऊसच्या फीडरमध्ये धामण साप शिरला होता. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन पंपहाऊस बंद पडलं होतं. यामुळे तब्बल चार तास पाणी उपसा बंद होता. याचा फटका शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. या कारणामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं होतं.