CM Devendra Fadanvis: सातत्याने विदर्भाच्या अन्यायावर बोलणारा मुख्यमंत्री लोकांच्या अन्यायावर बोलेल का? असे काहीजण म्हणायचे. माझ्या 5 वर्षात विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले. सर्वच जिल्ह्यात काम केले. रखडलेले प्रकल्प पूर्ण केले. सर्वच क्षेत्रात आपण एक मोठी भरारी मारल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री असताना उर्जा विभागात पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आपण तयार केलाय. सर्व प्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो अशी यंत्रणा तयार आहे. 6 नदीजोड प्रकल्पाचे काम महाराष्ट्रात गेमचेंजर ठरणार असल्याचेही ते म्हणाले.गडचिरोलीत नक्षलवाद कमी आहे. आता डिपमध्ये आपण जाऊ लागलोय. पुढच्या काळात निकराची लढाई होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीचे चित्र आपण बदलणार आहोत, असेही ते म्हणाले.
विदर्भाला औद्योगिक इकोसिस्टिम मोठ्या प्रमाणात उभी राहत आहे. या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल. पण याचं नियोजन आम्ही योग्य रितीने करत आहोत. कोणाच्या मनात शंका नको म्हणून लाडकी बहीणचा हफ्ता आम्ही जमा करायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. शिवराज सिंह चव्हाण यांनी एका वर्षात 20 लाख घरे महाराष्ट्राला देण्याची घोषणा केली. 2011 ची यादी चुकीची असून घरांची नोंदणी पुन्हा करण्याची परवानगी आम्ही केंद्राकडे मागितील. 26 लाख लोकांपैकी 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय घेतलाय. अटी, शर्थी सरकारने रद्द केल्या आहेत. आणखी एक नोंदणी करुन पुढच्या 5 वर्षात सर्वांना हक्काचे घर देऊ, असे ते म्हणाले.
रमाई, शबरी अशा सर्व योजनातील घरांना सोलर दिले जाणार आहे. जेणेकरुन त्यांना वीज बील येणार नाही. अशा अनेक योजना आमच्याकडे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपला प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अमूलाग्र बदल करतो, याचा नागपूरकरांना अभिमान वाटेल. कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी धैर्यपूर्वक आव्हानांचा सामना मी करतो. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे. त्यामुळे सत्ता माझ्या कधी डोक्यात जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
सायबर गुन्हे हे आपल्या सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले आहे. काही लोक याचा दुरुपयोग करतात. यासंदर्भात सायबर जनजागृती कॅम्पेन केले जात आहे. देशातला सर्वात मोठा सायबर प्लॅटफॉर्म आम्ही महाराष्ट्रात तयार केलाय. चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट आपण एक्स, व्हॉट्सअॅप, फेसबुकवर टाकली ती त्याची डिजिटल फूटप्रिंट आपल्याला मिळते. खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपण सहगुन्हेगार होतो. खोट्या गोष्टी लोकांनी फॉरवर्ड करु नये, असे आवाहन त्यांनी केले.