LokSabha: ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील नाराजी जाहीरपणे समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी यावर आपली नापसंती व्यक्त केली असून, ठाकरे गटावर आघाडी धर्म न पाळल्याने टीका केली आहे. ठाकरे गटाने 17 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले असून यातील मुंबईच्या 4 मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर जाहीरपणे खिचडी चोराचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे.
संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमोल किर्तीकर यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे आघाडीच्या धर्माचं उल्लंघन असल्याची टीका करताना संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांना 'खिचडी चोर' म्हटलं आहे. "शिवसेनेने खिचडी चोराला तिकीट दिलं आहे. आम्ही खिचडी चोरासाठी काम करणार नाही," असा निर्धारच संजय निरुपम यांनी केला आहे.
खासदार गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना करोनादरम्यान स्थलांतरितांच्या खिचडी वाटपातील कथित अनियमिततेच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने समन्स पाठवल्यानंतर संजय निरुपम यांनी हे विधान केलं आहे. संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वाने मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. मुंबईतील 6 पैकी फक्त 1 जागा घेत काँग्रेस पक्ष आपल्यासाठी खड्डा खोदत आहे असं ते स्पष्ट म्हणाले आहेत.
"मुंबईतील 6 पैकी ठाकरे गट 5 जागा लढणार आहे. दान केल्याप्रमाणे 1 जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे. हा निर्णय काँग्रेसला मुंबईत संपवण्याच्या हेतूने आहे," असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
"शिवसेनेने टोकाची भूमिका घेऊ नये. काँग्रेससाठी हे फार मोठं नुकसान ठरेल. काँग्रेस नेतृत्वाने मध्यस्थी करावी अशी माझी अपेक्षा आहे. अन्यथा पक्षाला वाचवण्यासाठी आघाडीतून बाहेर पडावं. शिवसेनेसोबतची आघाडी काँग्रेसला आत्मघातकी ठरेल," असा इशाराच संजय निरुपम यांनी दिला आहे.
संजय निरुपम यांच्या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे. "ते कोण आहेत? मला माहिती नाही. आमच्या पक्षात एक शिस्त आहे. एकदा उद्धव ठाकरेंनी नावं जाहीर केल्यानंतर ते प्रकरण आमच्यासाठी संपलं," असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.
ठाकरे गटाने पहिल्या यादीत 17 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. राज्यातील 48 पैकी 22 जागा आपण लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड- अनंत गिते
सिंधुदुर्ग, रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई, ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई, दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई, वायव्य- अमोल कीर्तिकर
मुंबई, दक्षिण मध्य - अनिल देसाईं
परभणी- संजय जाधव