नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतिय वर्ष समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हणून देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच नेते नव्हे. याआधी काँग्रेस आणि संघ यांचं नातं कसं राहिलंय..... काँग्रेसच्या दिग्गजांनी याआधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.
26 जानेवारी 1963 - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.
1962 मध्ये चीनविरुद्धच्या युद्धात पोलीस बल कमी पडलं, तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती... खरं तर जवाहरलाल नेहरु संघाचे कट्टर विरोधक होते... पण 1962 मध्ये स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेत नेहरुंनी 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विशेष निमंत्रण दिलं होतं.
१९६५ साली दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी संघाच्या स्वयंसेवकांकडून दिल्लीमध्ये पोलिसांचं काम करुन घेतलं होतं. संघाचीच उपशाखा असलेल्या विवेकानंद केंद्रानं कन्याकुमारीत विवेकानंद स्मारक उभारलं, त्यावेळी १९७७ साली इंदिरा गांधींनी या स्मारकाला भेट दिली होती. याहीआधी संघाच्या कार्यक्रमात महात्मा गांधीजीही सहभागी झाले होते.
संघाच्या शिस्तीचं गांधीजींनी वेळोवेळी कौतुकही केलं होतं. तसंच डॉ. झाकिर हुसेन, बाबू जयप्रकाश नारायण, जनरल करिअप्पा यांनीही संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती....