दीपक भातुसे, मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मोठ्या रक्कमेची बिलं आल्याने अनेकांना शॉक बसला होता. यानंतर राज्यभरात लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाजप आणि मनसेने वीज बिलात सूट देण्याची मागणी सरकारकडे केली होती.
आज मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. १० ते ३० टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. वीज बिलात सूट दिली गेली तर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.