मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडल आहे. आतापर्यंत राज्यात १५७४ लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर ११० कोरोनाबाधित रूग्णांचा बळी गेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
मुंबईत १००८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामध्ये ६४ लोकांचा बळी गेला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील ९ जिल्हे असे आहेत जिथे कोरोना व्हायरसच्या विषाणूंचा शिरकाव झालेला नाही. (Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा)
नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाबंदी झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात ही जिल्हाबंदी कडक पाळण्यात आली. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये आणि बाहेरील व्यक्ती गावात येऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावात येणारे सर्व रस्ते बंद करून टाकले.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये ९ मार्च २०२० रोजी आढळून आला. २३ मार्च ला जमाव बंदीने फरक पडत नसल्याचे पाहुन संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ही सीमा सील करुन एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतुक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली.
महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. नागरिकांची उपासमार होऊ नये, अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत केलेलं लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा होणार आहे.