पालघर : पालघर जिल्ह्याला आठ तारखेपर्यंत 'महा' नावाच्या चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसणार असून मच्छिमारांनी दोन ते तीन दिवस मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं अस आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६७ गावे समुद्र किनारी असून आजपासून सर्व समुद्र किनार्यावरील गावांमध्ये दवंडी पिटवण्यात येणार आहे. गावांमध्ये तात्पुरता निवारा व्यवस्था करण्यात आली असून ६ ते ८ तारखेपर्यंत चक्रीवादळाच्या प्रभावानुसार शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात रौद्ररुप धारण केलेलं 'महा' चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत गुजरात किनारपट्टीकडे प्रयाण करण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला मध्यरात्री ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे गुजरात तसंच उत्तर कोकणातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक या पाच जिल्ह्यांत वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल. 'महा' चक्रीवादाळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहील.