Darshana Pawar Murder Case: एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार (Darshana Pawar) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी राहुल हंडोरेला (Rahul Handore) पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. राहुलला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली होती. राहुलचे लोकेशन वेगवेगळ्या राज्यात दाखवत होते. त्यामुळं त्याला ताब्यात घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी राहुल हंडोरेच्या मुसक्या आवळल्या आहेत. दर्शना हत्या प्रकरणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच, दर्शनाच्या हत्येआधीच सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. ( Darshana Pawar Murder Case CCTV Footage)
काही दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह आढळला होता. दर्शना तिचा मित्र राहुल हांडोरेसोबत किल्ले राजगडावर फिरायला गेली होती. अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं संशयाची सुई राहुलवर होती. दर्शनाच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राहुलवर पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांना त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
राजगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दर्शना आणि राहुल राजगडावर जातानाचे दृश्य कैद झाले आहे. दर्शना आणि राहुल दोघेही १२ जूनला राजगडावर दुचाकीने जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. दर्शनाने चेहऱ्यावर स्कार्फ बांधल्याने तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. पण राहुलचा चेहरा स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली.
राहुल आणि दर्शनाने साधारण सव्वा सहाच्या सुमारास राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. मात्र, १० वाजण्याच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसला आहे.
दर्शना आणि राहूल एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता.
दर्शनाच्या कुटुंबीयांनी त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तीच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली, असे पोलिस तपासात समोर आले आहे.