चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात दोन बछड्यांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात असलेल्या फुलझरी गावालगतच्या जंगलात या वाघाच्या बछड्यांचा मृत्यू झाला असून या बछड्यांचं वय हे अंदाजे ६ महिने आहे. सोमवारी संध्याकाळी पेट्रोलिंगच्या दरम्यान मूल वनपरिक्षेत्रातील डोणी कक्षाच्या हद्दीत वन कर्मचाऱ्यांना हे बछडे मृत अवस्थेत आढळून आले. या बछड्यांचा मृत्यू हा एखाद्या मोठ्या वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज आहे.
मृत बछड्यांच्या अंगावर मोठ्या वाघाच्या दाताच्या खुणा आढळून आल्या आहेत. मोठे वाघ हे आपल्या क्षेत्रात असलेल्या लहान पिल्लांना भविष्यातील आव्हान मानून त्यांना हुसकावून लावतात किंवा त्यांना ठार मारतात. याच प्रकारच्या संघर्षातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या दोन्ही मृत बछड्यावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले असून यासंदर्भातील अधिक चौकशी वनविभागाचे पथक करीत आहे.