अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पतीला एक भावनिक पत्र लिहिलं आहे. एका अप्रिय माणसामुळे, एकाच्या वाईट वागणुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला अत्यंत प्रिय असलेल्या दीपाली यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्यांनी आपल्या पतीला पत्रातून भावनिक साद घातली आणि शेवटची इच्छाही व्यक्त केली आहे. हे पत्र मन हेलावून टाकणारं आहे.
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. जिवापेक्षा जास्त काय करावं आता मी जीव देत आहे. तू रात्री मला खूप शांत केलंस. साहेब मला काय काय बोलले, ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतो, मी शांत राहते, पण जानू मला सहन होत नाही. तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरुन गेली. खरंच भरुन गेली माझ्या साहेबांनी मला पागल करुन सोडले. माझा इतका अपमान कधीच कुणी केला नाही, जितका शिवकुमार साहेब करतात.
मी खूप सहन केलंय पण आता माझी लिमिट खरंच संपली आहे. यावर उपाय असू शकतो, मी सुट्टी घेऊ शकते, पण सुट्टी देखील मंजूर करत नाही. पगार कापतो, तुझ्याशी बोलायचं होतं, मी तुझी वाट पाहत होते तू घरी यायची. आज आई पण गावी गेली, घरी कोणीच नाही, घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे, मला माफ कर. तू जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस, मला मानसिक त्रास होत आहे, म्हणून तू माझ्याजवळ येऊन राहिलास, पण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचा त्रास देणे कमी झालं नाही, मला त्याचा त्रास खूप आहे.
मला त्याच्या हाताखाली काम करावे लागणार म्हणून मी त्याच्या वागण्याची कधीच तक्रार केली नाही. तुला वाटतं मी तुझ्यापेक्षा खूप मोठ्या पदावर जावं, त्यासाठी तू प्रयत्न पण करत आहेस. पण मी खोट्या प्रकरणांमध्ये इतक्या वाईट फसले आहे, की मला बाहेर निघता येत नाही आहे. मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझं आयुष्य बरबाद केलं.
बाकी जाऊ दे, तू तुझी काळजी घे. तुझी म्हणजे तुझ्या पोटाची बरं. खूप व्यायाम कर नेहमीसारखा. माझ्यासारख्या आळशी नको. आईची व नितेशची काळजी घे, तूच सगळ्यांना सांभाळणार आहेस मला माफ कर. मी आपल्या बाळाला गमावलं. आपला परिवार अजून पूर्ण नव्हता झाला. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला नजर लागली आहे. तू तुझ्यासाठी सेटिंग करायला सुरुवात कर. माझ्या बोलण्याने मी तुला कधी दुखावलं असेल, तर मला माफ कर. तुझं लग्नाचं वय अजून गेलेलं नाही. तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको करु, नाहीतर ती पण माझ्यासारखी तुला वेळ देणार नाही. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.
माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार वनरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. मी मानसिक त्रासाला कंटाळून जीव देत आहे. माझे बँक पासबुक दागिने सर्व कपाटात आहे, सगळं माझ्या आईच्या ताब्यात देईन, माझं मंगळसूत्र आणि तू केलेला माझा नवीन हार तुझ्याकडे माझी आठवण म्हणून ठेव. आईला सुखरूप घरी पोहोचव, नितेशच्या लग्नात नाचायला मी नसेन, पण माझे आशीर्वाद नेहमीच त्याच्या पाठीशी असतील.
आई मी रात्रीसुद्धा माहेरा सारखीच राहिली, माझ्याकडून कधी चूक झाली असेल तर मला माफ करा, ज्याने आयुष्यात आपला संसार अपूर्ण राहिला, पण पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करु, आय लव यू सो मच मला तुझ्या मिठीत राहायचं होतं कायम, आज सकाळी जाताना तुझी आणि माझी भेट झाली नाही, मला माफ कर मी तुझी साथ सोडून जात आहे, माझ्यासाठी तू सगळं सहन केलं, पण मी कमी पडत आहे माझी हार्ड डिस्क फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार आहे.
-दीपाली चव्हाण