Ajit Pawar on Raj Thackeray: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला होता. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका करत राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान आता अजित पवारांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येकाने बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच राज्याच वाचाळवीरांची संख्या वाढली आहे असा टोला लगावला आहे. "प्रत्येक पक्षाबद्दल एक आस्था असणारा एक वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जी शिकवण दिली त्याच्या बाहेर जाऊ नये," असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
"काहीजण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला बघून घेईन म्हणतात. अरे काय बघून काय घेईन? संविधान, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही. वाचाळवीरांची संख्या आता वाढलीच आहे. स्वतकडे लक्ष केंद्रीत करण्याचं काम बंद झालं पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही," असंही अजित पवार म्हणाले आहेत.
"पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असा पाऊस पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का? नदी जाणारं जगातील हे एकमेव शहर नाही. तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे," असी टीका राज ठाकरेंनी केली होती.
"दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे," अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला NDRF चा लाँग फॉर्म माहित नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. यानंतर मनसैनिकांनी अकोल्यात अमोल मिटकरींची गाडी फोडली असून तणाव निर्माण झाला आहे.