ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : धाराशिवमध्ये (Dharashiv Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच एका विवाहित महिलेच्या डोक्यात व छातीत गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी धारशिव जिल्ह्यामध्ये समोर आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना (Dharashiv Police) यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भूम तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भूम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भूम तालुक्यातील चिंचपूर ढेगे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कुजलेला मृतदेह पाहून घाबरलेल्या ग्रामस्थांनी भूम पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच भूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला होता. मात्र तपासानंतर महिलेच्या डोक्यात आणि छातीत गोळी मारुन तिची हत्या करुन तिचा मृतदेह साडीत गुंडाळून ढेगे येथील शिवारात टाकण्यात आल्याचे समोर आले.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच ही 26 महिला विवाहित असल्याची माहिती समोर आली होती.
याप्रकरणी भूम पोलिसांनी लक्ष्मण नागणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण नागणे याने या विवाहित महिलेकडे लग्नाची मागणी केली होती. विवाहित असल्याने महिलेने लग्नास नकार दिला याच रागातून आरोपी लक्ष्मण नागणे याने महिलेची गोळी झाडून हत्या केली आणि मृतदेह साडीत गुंडाळून शेतात टाकून दिला. बुधवारी गावकऱ्यांना महिलेचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. साडीमध्ये केवळ महिलेच्या हाडांचा सापळा उरला होता. आरोपी लक्ष्मण नागणे हा फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत होते.
नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील पुनावळे येथे राहणाऱ्या लक्ष्मण नवनाथ नागणे याने मृत विवाहित महिलेला चिंचपूर ढेगे शिवारातील एका व्यक्तीच्या उसाच्या शेतामध्ये बोलवून लग्नाची मागणी घातली होती. मात्र विवाहित असल्याने महिलेने लग्नास नकार दिला. नकार मिळाल्यामुळे रागाच्या भरात लक्ष्मण नागणेने विवाहितेच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या घालून तिची निर्घृण हत्या केली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने मृतदेह साडीमध्ये गुंडाळून तिथेच शेतात टाकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केला होता.