Monsoon In Maharashtra: महाराष्ट्रात मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. काही ठिकाणी पुरस्थितीदेखील निर्माण झाली आहे. पहिल्या पावसात काही ठिकाणी जिवितहानीदेखील झाली आहे. अंगावर झाड पडून, तर कुठे वीज कोसळून नागरिकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सिंदखेडराजा तालु्क्यात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. सहा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी संध्याकाळी काल सायंकाळी चिखली , सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली, अनेक झाडेही पडली. दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वादळाने घरावरील छ्प्पर उडालं आहे. यावेळी घराच्या छताला बांधलेल्या झोक्यात सहा महिन्यांची चिमुरडी झोपली होती. मात्र, त्याचवेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळं झोका उंच उडाला. झोका घराच्या छताला एका लोखंडी अँगललला बांधलेला होता. वादळाने अँगलसह छत व चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेलं.
घराचे छप्पर साधारणतः २०० फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती ६ महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती. या घटनेने साखरे कुटुंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमरावती जिल्ह्यात काल सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली या वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने अमरावतीत सहा वर्षीय चिमुकलीवर काळाचा घाला घातला आहे. अमरावतीत वीज पडून 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून काल सायंकाळी अमरावतीत विजांच्या गडगडाटासह झाला मुसळधार पाऊस झाला यात शहरातील संजय गांधी नगर येथील निवि दंडे हीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. निवि पावसाचा आनंद घेत छतावर खेळत होती तेव्हा वीज कोसळली आणि चिमुकलीचा अंत झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे मुसळधार पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे वीज पडून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.