जळगाव : भाजपाला माझा विरोध नव्हता. मला मंत्रीपदावरून का काढलं याचं कारण मला अजूनही कळालं नाही. भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला. फक्त एका व्यक्तीमुळे माझं नुकसान झालं असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर अन्याय झाला, भाजपने माझ्यावर अन्याय केला असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीत स्वागत केल्यानंतर ते मुक्ताईनगरात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. शिवाय त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना होती. आता मी भाजप सोडलं आहे आणि त्याचा आनंद कार्यकर्त्यांना आनंद झाला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
रोहिणी खडसेंना तिकीट का देण्यात आलं हे देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं, 'रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही खेळी केली. त्याविषयी मी चंद्रकांत पाटील यांना दहा महिन्यांपूर्वीच पुरावे दिले होते. मात्र कोणताही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचा संताप त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना व्यक्त केला.