मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मालेगावातील पोलीस वसाहतीचं उद्घाटन पार पडलं. या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या तोंडी पंतप्रधानांचे नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना चुकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आले. मात्र लगेचच त्यांनी आपली चूक सुधारली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त मालेगावात त्यांनी आज पोलिस वसाहतीचं उद्धाटन केले. राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस 24 तास झटत असतात. त्यामुळे पोलिसांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी घरे निर्माण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लॅस्टर्स पडत आहेत. दरम्यान त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईतही एक बैठक नुकतीच पार पडल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली. यात मुंबईत 50 हजार पोलीसांच्या तुलनेत केवळ 19 हजार घरेचं उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवासी घरे तयार करायच्या आहेत आणि जुन्या वसाहती दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मत नोंदवल.