अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यभरातही भाजप-शिवसेनेने दमदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगरमध्ये भाजपकडून निवडणूक लढणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
सुजय विखे पाटील यांचा विजय समोर दिसत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. 'माझं सीमोल्लंघन झालेलं आहे. अहमदनगर आणि शिर्डीचे अंतिम निकाल येऊ द्या,' असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी झी २४ तासच्या कार्यक्रमात केलं आहे. तसंच कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
अहमदनगरमधली जागा सुजय विखे पाटील यांना मिळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडायला नकार दिला. या जागेवर राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. अहमदनगरच्या जागेवरून झालेल्या वादानंतर विखे पाटील आणि पवार घराण्यामधलं जुनं वैरही काढण्यात आलं होतं.
अहमदनगरच्या जागेच्या वादानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसनेही राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आहे.