किरण ताजणे, पुणे : भारतीयांच्या सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र पुणे सायबर गुन्हे शाखेनं हा कट हाणून पाडला. कुणी रचला होता हा कट? नेमकं काय घडलं?
पुण्यातल्या शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यानं मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. बँकांकडचा महत्त्वाचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एका महिलेला काही भामट्यांनी बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. महर्षी नगरच्या बंगल्यात डेटा ट्रान्सफरचा हा कट आखण्यात आला होता. गुजरात आणि आंध्र प्रदेशातून दोघेजण डेटा घेऊन आले होते. डेटा खरेदीसाठी औरंगाबाद आणि पुण्यातून चौघेजण आले होते. नामांकित कंपन्यांचे चार कॉम्प्युटर इंजिनिअरही तिथं होते. सुमारे 25 लाख रुपयांचा हा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून लॅपटॉप, मोबाईल, कार, बाईक अशा मुद्देमालासह 10 जणांना अटक केली.
उच्चशिक्षित असलेल्या या टोळीनं बँकांच्या सर्व्हरवरून ग्राहकांचा डेटा चोरला. चोरलेल्या डेटाचे स्क्रीनशॉट दाखवून व्यवहार केला जात होता. विविध बँकांची चालू खाती आणि निष्क्रिय खाती यांचा हा डेटा होता. सायबर एक्स्पर्ट, कॉम्प्युटर इंजिनिअर, बड्या राजकीय व्यक्तींचा त्यात सहभाग होता. याप्रकरणी भाजपच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष रोहन मंकणी यांनाही अटक करण्यात आली आहे.
बँकांच्या डेटा विक्रीचा हा डाव पोलिसांनी उधळला असला तरी यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्याची पाळंमुळं शोधण्याची आता गरज आहे. बँक ग्राहकांचा महत्त्वाचा डेटा बाहेर येतोच कसा? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? राजकीय व्यक्तींची त्यात नेमकी भूमिका काय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधावी लागणार आहेत.