मुंबई : एकीकडे केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा वाढवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येतेय, तर दुसरीकडे केंद्राने पुरवलेल्या लसींपैकी ५६ टक्के लसी वापरल्याच नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लशी वाया
पण लसीचं नेमकं होतंय काय? आणि खरोखर त्या वाया चालल्या आहेत का, याबाबत आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाकडे असलेल्या आकडेवारीनुसार देशभरात कोरोना लसी वाया (Corona vaccine wastage) गेल्याचं प्रमाण ६.५ टक्के आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा ( Telangana, Andhra Pradesh, Uttar Pradesh) नंबर सगळ्यात जास्त आहे.
लस वाया जाण्याचं कारण काय?
एकतर लसीची बाटली हरवणं, खराब होणं किंवा टाकून दिल्याने लस वाया जात असू शकते. अनेकदा लसीकरणाचं नियोजनही व्यवस्थित नसल्याचं सांगितलं जातं.
एकदा लशीची बाटली उघडली की, ठराविक कालावधीत १० जणांना त्यातला डोस द्यावा लागतो. मात्र जर लसीकरणासाठी तेवढे लोक त्या वेळेत केंद्रावर आलेच नाहीत, तर मात्र ती लस वाया जाते. आणि परिणामी टाकून द्यावी लागते.
मनीकंट्रोलला आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डपेक्षा (Covisheild) भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) वाया गेल्याचं प्रमाण जास्त आहे. कारण कोवॅक्सीनची बाटली उघडली, की त्यातून २० जणांना डोस द्यावे लागतात. मात्र तेवढे लोक लस घ्यायला आलेच नाही, तर ती लस वाया जाते.
याशिवाय तापमान हा ही एक कळीचा मुद्दा आहे. लस एका ठराविक तापमानातच ठेवावी लागते. अतिउष्णता किंवा अति थंड तापमानातही लस ठेवल्याने ती वाया जाऊ शकते.
पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ( PM Modi meet with CM ) बैठक झाली. त्यावेळीही पंतप्रधानांनी सांगितलं की, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तरप्रदेशात लस वाया जाण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यांनी यासंदर्भातही निरीक्षण करावं, असा सल्ला मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला.