Virat Kohli: शतक ठोकून पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला विराट कोहली?

Virat Kohli Reaction After Century:   सेंच्युरी मारुन पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला? जाणून घेऊया 

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2025, 10:20 PM IST
Virat Kohli: शतक ठोकून पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला विराट कोहली?
विराट कोहली

Virat Kohli Reaction After Century: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. विराट कोहलीच्या सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला.  या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानी संघ फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण टीम 241 धावांवर तंबूत परतली. या सामन्यात कोहलीने भारतासाठी खेळताना सेंच्युरी पूर्ण केली. तसेच एकदिवसीय सामन्यात 14 हजार धावा पूर्ण केल्या. दरम्यान सेंच्युरी मारुन पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर विराट कोहली काय म्हणाला? जाणून घेऊया 

विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या 15 धावा केल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 14 हजार धावा पूर्ण झाल्या. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने हे फक्त 287 डावांमध्ये ही किमया केली. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 19 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. सचिनने 350 डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण केल्या. सचिनने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून या धावा पूर्ण केल्या. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 14 पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. असे करणाऱ्यांमध्ये तो भारताचा सचिन तेंडुलकर (18 हजार 426 धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (14 हजार 234 धावा) यांच्यात सामील झाला आहे.

काय म्हणाला विराट कोहली? 

टीम इंडियाचा विजय आणि विराट कोहलीची सेंच्युरी या दोघांची क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते. टीम इंडियाला जिंकायला 2 रन्स आणि विराटच्या सेंच्युरीला 4 रन्स हवे होते. त्यावेळी साऱ्यांच्या नजरा विराटकडे लागल्या होत्या. पण विराटने शेवटच्या बॉलला फोर मारुन सेंच्युरी पूर्ण केली आणि टीम इंडियाने मॅच खिशात टाकली. यानंतर विराट म्हणाला, 'रोहित लवकर आऊट झाला होता. आम्हाला चांगली पार्टनरशिप करायची होती. मधली फळी मला चांगली खेळायची होती. स्टेडियममधून आवाज येत होता. पण मला माझं लक्ष विचलित करायचं नव्हत. माझ्या स्किलवर मी फोकस केलंय. मला माझ्या टीमला जिंकवून द्यायचं होतं. तुम्ही मेहनत करता तेव्हा देव तुम्हाला साथ देतो, असे कोहली म्हणाला.  खेळात क्लॅरिटी असणं गरजेचं असतं. आमच्या बॉलर्सनी आम्हाला चांगली सुरुवात करुन दिली होती. शुभमन गिलने खूप चांगली खेळी केली. श्रेयश अय्यरचा फॉर्मदेखील चांगला असल्याचे तो म्हणाला. 

तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगला खेळ

2008 मध्ये विराट कोहलीने टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, आतापर्यंत त्याने 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण14 हजार 7 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 50 शतके आणि 73 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत. त्याने टीम इंडियासाठी 123 कसोटी आणि 125 टी20 सामने खेळले आहेत. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे.