चेतन कोळस, येवला, झी मीडिया
Farming In Maharashtra: हवामान बदलाचा परिणाम शेतीवरही होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटी यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षात हिवाळ्यात पाऊस झाल्यामुळं काढणीला आलेले पिक वाया गेले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे. अवकाळीमुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळंच तरुण शेतकरी आता मॉर्डन शेतीकडे वळले आहेत. निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्यानेही शेतीला आधुनिक पर्याय निवडला आहे.
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील पालखेड येथे सफरचंदाची शेती करण्यात आली आहे. अवकाळी तर कधी गारपीटीमुळं द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गावांना तडाखा बसतो. यात सर्वात जास्त द्राक्ष पिकांचे नुकसान होते. यामुळंच पालखेड येथील प्राध्यापक व तरुण शेतकरी भरत बोलीज यांनी शेतीत काही तरी वेगळा प्रयोग राबवला आहे.
भरत यांनी हिमालयीन शिमला अँना या जातीच्या सफरचंदाच्या 30 झाडांची लागवड केली आहे, मार्च 2023मध्ये त्यांनी ही झाडे लावली होती. आत्तापर्यंत शंभर रुपये एक झाड या प्रमाणे तीन हजार रुपयांचा खर्च आला आहे. तसंच, झाडाला सफरचंदाचे फळदेखील आले आहे. या फळांची काढणी एप्रिल, मे महिन्यात सुरू होणार आहे. जम्मू काश्मीर अगोदरच येथील सफरचंद बाजारात दाखल होणार असल्याचे शेतकरी बोलीज यांनी म्हटलं आहे.
पालखेड येथील भरत बोलीज यांनी सफरचंदाची लागवड केली असून या झाडांना फळ आल्याने हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला आहे. निफाड तालुक्यातील निफाड तालुक्यातील पालखेड येथील साहेबराव बोलीज यांचा मुलगा भरत बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे प्राध्यापक म्हणून कामकाज करत होते. पण कोव्हीडचा प्रादुर्भाव झाल्याने नोकरीवर गदा आल्याने आता काय करावे असा प्रश्न उभा राहिला असता वडिलोपार्जित शेती करावी, असा त्यांनी विचार केला.
शेतीचा पर्याय स्वीकारला असला तरी अवकाळी, गारपीटीचा दरवर्षी तडाखा बसत असल्याने द्राक्ष बागेचे नुकसान होते आणि लाखोंचा खर्च वाया जातो. त्यामुळं शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा, अशी कल्पना सुचली. त्यावेळी त्यांनी हिमालयीन शिमला अँना या जातीचे सफरचंदाची 30 झाडे आणून लागवड केली.