योगेश खरे, झी मीडिया, जळगांव : जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी जोरदार हाणामारी झाली. खडसे आणि महाजन समर्थक एकमेकांना भिडले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा राडा झाला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून ही हाणामारी झाली. सध्या भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणूक सुरू आहेत. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी ११ जण इच्छुक होते. मात्र त्यापैकी कुणाचीही निवड न झाल्यानं कार्यकर्ते संतापले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा गोंधळ झाला. यावेळी भाजप सरचिटणीस आणि खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली. नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. याआधी जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेरमध्ये व्यासपीठावरच जोरदार हाणामारी झाली होती. तत्कालिन मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यावेळी हात धुऊन घेतले होते. अशा वाढत्या राडा संस्कृतीमुळं भाजपच्या शिस्तबद्ध पक्ष या प्रतिमेला तडा जातो आहे.
पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीदवाक्य... जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात समेट झाल्याचं चित्र समोर आलं होतं. मात्र जळगाव भाजपमध्ये अजून काहीच आलबेल नाही, हे यानिमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.