भारतात मान्सूनचं आगमन झालं आहे. केरळ आणि ईशान्य भारतात मान्सूननं एकत्रच हजेरी लावली आहे. मान्सून दाखल झाल्यामुळं मासेमारी हंगाम आजपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळं पुढील 2 महिने मासळीचे लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळं कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. रत्नागिरी मधील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करणाऱ्या बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहे. रत्नागिरीमधील प्रसिद्ध फोटोग्राफर तन्मय दाते यांनी आपल्या ड्रोनच्या साहाय्याने हे चित्र टिपले आहे.
मान्सून भारतात दाखल होताच मासेमारी बंद करण्यात आली आहे. 31 मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. 1 जून पासून पुढील 2 महिने बोटी किनाऱ्यावरच असणार आहे. या सगळ्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादनाचा काळ असतो. त्यामुळे रत्नागिरीतील हर्णे बंदरातील मासळी लिलाव पुढे दोन महिने बंद असेल. समुद्रातील मासेमारीला दरवर्षी पावसाळ्यात एक जून ते 31 जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून बंदी घालण्यात येते. या कालावधीत यांत्रिक मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या दोन महिन्याच्या कालावाधीत जर मासेमारी केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 2021 नुसार कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलंय. कलम 14 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
मासेमारी बंदीच्या काळात ट्रॉलरमधील कामगार त्यांच्या मूळ गावी निघून जातात. हे कामगार ऑगस्टमध्ये कामकाज सुरू करण्यासाठी जुलैच्या शेवटी किनारपट्टीच्या राज्यात परत येतात. ट्रॉलरवर काम करणारे बहुतांश कामगार हे इतर राज्यातील आहेत, ज्यांना मासेमारी बंदीच्या काळात सुट्टी मिळते. इतर काळ त्यांना मासेमारी करावी लागते.
माशांच्या प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून किनारपट्टीच्या राज्यात दरवर्षी ही बंदी लागू केली जाते. त्यासोबतच या दोन महिन्यात समुद्रातील खराब हवामानामुळे बोटी समुद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. परत सर्व कामगार हे 1 ऑगस्टनंतर नियमीतप्रमाणे मासेमारी सुरु करणार आहेत.