हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं

 सभेवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली आहे.  

Updated: Jun 2, 2022, 09:31 AM IST
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला डिवचलं  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सभा घेत आरोप - प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे. येत्या 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ज्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा पार पडली तिथेच ही सभा होणार असल्यामुळे सभेची चांगलीच चर्चा रंगली आहे. सभेवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली आहे.  

गजानन काळे यांचं ट्विट काय?

बाबरी मशीद पडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्या मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमीसोबत सत्तेचा पाट का मांडला? संभाजीनगरला सेनेचा विधानपरिषदेचा आमदार एमआयएमच्या नगरसेवकांची मदत घेऊन का करावा लागला? उत्तर संभाजीनगरच्या"टोमणे सभेत"ढोंगी हिंदुत्ववादी देणार का ? 

गजानन काळे यांनी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. पुन्हा सेनेच्या हिंदुत्त्वावादाच्या मुद्द्यावरुन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते आहे. 

सेना - मनसे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आमने सामने - 

गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेले दिसतायेत. भोंगा, हनुमान चालिसा, संभाजीनगर, औरंगाजेबच्या कबरीवर औवेसींनी वाहलेल्या फुलांवरुन दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कोणाचं हिंदुत्त्व खरं आणि खोटं यावरुन दोन्ही पक्षांनी सभा घेत एकामेकांवर निशाणा साधला आहे. 

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची 8 जूनला सभा - 

मे महिन्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेतली आणि आता 8 जून रोजी मुख्यमंत्र्याची त्याचठिकाणी सभा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणत्या प्रश्नांवर बोलणार आणि कोणावर पुन्हा निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. संभाजीनगर नामकरणावरुन मुख्यमंत्री पुन्हा काय उत्तर देतील याची उत्स्कुता सगळ्यांना लागली आहे.