नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान जगप्रसिद्ध ड्रमरची पुण्यातील ढोलताशा पथकासोबत जुगलबंदी; पुन्हापुन्हा पाहिला जातोय त्याचा 'हा' Video   

सायली पाटील | Updated: Sep 20, 2023, 04:03 PM IST
नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच title=
Ganeshotsav 2023 Greg Ellis playing tasha with pune dhol pathak old video going viral again

Pune Ganeshotsav : गणेशोत्सव म्हणजे माहोल.... गणेशोत्सव म्हणजे सबंध वर्षातील असा काळ जेव्हा सर्वकाही अगदी सकारात्मक वाटू लागतं. गणेशोत्सव म्हणजे कॅलरीमीटर बाजूला ठेवून मोदकांवर मारला जाणारा ताव आणि गणेशोत्सव म्हणजे बाप्पाला मनातलं सारंकाही सांगण्याची संधी. अशा या प्रत्येक अंगानं खास असणाऱ्या उत्सवाची विविध रुपं एकट्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात. देशविदेशातही बाप्पांसाठी विविध प्रकारची आरास, नैवेद्य आणि उत्सवाचा घाट घातला जातो. त्यातही मुंबई- पुण्यातील गणेशोत्सव अगदीच खास असं म्हणायला हरकत नाही. 

मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे उंच गणेशमूर्ती, देखावे, समाजोपयोगी कामं आणि या शहराचा न संपणारा उत्साह. तर, पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे पारंपरिकतेची किनार आणि सोबत संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नशीच असणारी अनेक कलापथकं. 

अशा या पुण्यातील गणेशोत्सवाची अनेकांनाच भुरळ. परदेशी नागरिकही याला अपवाद ठरलेले नाहीत. यंदाच्याच वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 36 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. यामध्ये काही परदेशी महिलांचाही समावेश पाहायला मिळाला. भारताची संस्कृती समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी या मंडळींची उत्सुकता वाखाणण्याजोगी असते. अशा या गणशोत्सवाचे काही व्हिडीओ, फोटो, रील्स सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. 

व्हिड़ीओंची ही न संपणारी रांग पाहता तुमच्यासाठी हे एक कमालीचं करमणूक साधनच म्हणावं लागेल. अशा या व्हिडीओंच्या गर्दीत काही जुनी दृश्यही नजरा वळवत आहेत. जिथं एक परदेशी कलाकार चक्क पुण्यातील ढोलताशा पथकांसोबत रमल्याचं दिसत आहे. हा परदेशी कलाकार आहे जगप्रसिद्ध ड्रमर ग्रेग एलिस. 

हेसुद्धा पाहा : मुंबईतील सर्वात श्रीमंत GSB गणपती; 67 किलो सोनं आणि 325 किलो चांदीच्या आभूषणाने बाप्पाची सजावट

 

ग्रेग काही वर्षांपूर्वी भारतात आला होता. त्यावेळी गणेशोत्सव काळात तो नेमका पुण्यातच होता. जिथं त्यानं ढोलताशा पथकांचा उत्साह पाहून ताशाची काठी हातात घेत आपलीही कला सादर केली. ताशा वादकांसोबत त्याची जुगलबंदी इतकी रंगली की आजुबाजूला पाहणाऱ्यांची गर्दी वाढतच गेली. बरं, हा परदेशी पाहुणा आपल्यासोबत इतका सुरेख ताळमेळ साधून वाजवतोय हे पाहताना वादकांनाही आश्चर्यच वाटलं होतं. ग्रेगनं ताल तोडताच तो ताशा वादकांनी उचलून धरण्याचं हे सत्र बराच वेळ सुरु राहिलं होतं. हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असला तरीही त्यातून आपल्यापर्यंत पोहोचणारा उत्साह काही औरच आहे असं म्हणायला हरकत नाही.