आशिष अम्बाडे, झी 24 तास, चंद्रपूर: लसीकरणासाठी सरकार आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिकेनं मात्र आयडियाची कल्पना लढवली जात आहे. इथं लसवंतांना महापालिकेकडून टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनचं बक्षीस दिलं जाणार आहे.
लसीकरण मोहिमेला लोकांचा प्रतिसाद मिळावा म्हणून चंद्रपूर महापालिकनं एक हटके योजना सुरू केली आहे. जे लोक लस घेतील अशा लसवंतांचा लकी ड्रॉ काढून विजेत्यांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन बक्षिस म्हणून दिलं जाणार आहे.
याशिवाय 10 विजेत्यांना मिक्सर दिले जाणार आहेत. त्यासाठी 21 लसीकरण केंद्रांवर लकी ड्रॉ बॉक्स ठेवण्यात आले आहेत. 12 ते 24 नोव्हेंबर दरम्यान लस घेणाऱ्या लोकांसाठी ही योजना लागू असेल.
लस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये रेशन बंद करण्याची कडक भूमिका घ्यावी लागत आहे. चंद्रपुरात मात्र बक्षिसाचं आमिष दाखवून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केलं जात आहे. मात्र कोरोनाला हरवायचं असेल तर लोकांनी जबाबदारी ओळखून लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येण गरजेचं आहे.