प्रफुल्ल पवार / रायगड : धो धो पाऊस कोसळत आहे. नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. काही ठिकाणी पुलावरुनही पाणी वाहत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्ह्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाही काही महाभाग आहेत की ते दुसऱ्यांच्या जीवाशी खेळतात. असाच एक प्रकार महाडमध्ये घडला. एसटी चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला आहे. नागेशवरी बंधारा ओव्हर फ्लो असताना एसटी पलीकडे नेली. चालकाचे धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतले असते.
काल सोमवारी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी नाल्याना पूर आला होता. महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील नागेशवरी बंधारा देखील ओव्हरफलो वहात होता. अशावेळी या बंधाऱ्यावरून गाडी पलीकडे नेण्याचे धाडस एसटी चालकाने दाखवले. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
सुदैवाने बंधारा पार करून गाडी सुखरूप पलीकडे नेण्यात चालक यशस्वी ठरला. अन्यथा चालकाचे हे धाडस त्याच्यासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकले असते. दरम्यान या संदर्भात रायगड एसटीच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याशी संपर्क साधला असता ही बस पुणे विभागाची होती, असे सांगितले आहे. ही एसटी पिंपरी चिंचवड ते वेळास या मार्गावर धावत होती. त्याबाबत आपण तेथील अधिकाऱ्यांना कळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुसळधार पावसामुळे काल सावित्री, कुंडलिका, अंबा या नद्यानी इशारा पातळी ओलांडली होती. आता पाऊस कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी देखील कमी झाली आहे.असं असलं तरी हवामान खात्याने जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे.