कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर  कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.  

Updated: Aug 1, 2019, 11:34 PM IST
कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा title=

कोल्हापूर, रायगड :  कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने पुराचा धोका वाढला आहे. नदी काठच्या गावांना आणि महाड, पोलादपूर येथेही भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ५ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होईल तर पुढील २४ तासात रायगडमध्येही अतिवृष्टी होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रायगड जिल्ह्यात दक्षिण भागात आज दुपारपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली . महाडसह पोलादपूर , माणगाव , तळा , रोहा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .  नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून डोलवहाळ बंधाऱ्यात कुंडलिका नदीचे पाणी  इशारा पातळी पर्यंत पोहोचले आहे . सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत . लावणीची कामे पूर्ण झाली असली तरी पाणी शेतात तुंबून राहिल्यास रोपे कुजण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

 दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून आगामी चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस  होण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. गरज असेल  तरच घराबाहेर पडावे असे  स्पष्ट केले आहे.