मुंबई : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. राज्यभरातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परिक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नजर परीक्षा केंद्रांवर असणार आहे. परीक्षेसंदर्भात संपूर्ण तयारी झाल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ०२४०-२३३४२२८, २३३४२८४, २३३१११६ या क्रमांकावर संपर्क साधून निवारण करु शकता असे देखील मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
यंदा राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात 8 लाख 43 हजार विद्यार्थी आणि 6 लाख 61 हजार विद्यार्थींनींचा समावेश आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर सकाळी साडेदहा वाजता पोहचायचं असून, ११ वाजता त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
तर ११ नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात केंद्र संचालकांनी पडताळणी करून बोर्डाला माहिती द्यावी. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलीय. त्याचसोबत परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 273 भरारी पथकं फिरती राहाणार आहेत.