मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. 

Updated: May 2, 2020, 07:15 AM IST
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ title=
संग्रहित छाया

मुंबई/ औरंगाबाद/जळगाव : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडाही दोन हजारांच्या आसपास गेला आहे.  राज्यात कोरोनाचे नवीन १ हजार ८ रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. यात मुंबईच्या ७५१ रुग्णांचा समावेश आहे. तर औरंगाबादमध्ये आणखी सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जालन्यात आणखी पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

औरंगाबादमध्ये २१६ पर्यंत आकडा पोहोचला

औरंगाबादमध्ये आणखी सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१६ इतकी झाली आहे. औरंगाबादचा हॉट स्पॉट असलेल्या मुकुंदवाडी भागत मोठ्या संख्येनं रुग्ण वाढले आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान उद्यापासून औरंगाबाद शहर विषम तारखेला पूर्ण बंद राहील तर सम तारखेला सकाळी ७ ते ११ या वेळेतच जीवनावश्यक दुकानं सुरू राहतील. १७ मेपर्यंत याची अंमलबजावणी असेल, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच जळगावात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे. 

जालन्यात रुग्णांची संख्या सहावर  

जालन्यात आणखी पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. जालना शहरातील चौधरीनगर आणि परतुरमध्येही प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, जालन्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. 

जळगावात  बाधितांची संख्या ४१ वर

जळगावात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमळनेर, जोशीपेठ,पाचोरा इथल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. जळगावात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. तर, १२ जणांचा मृत्यू झाला असून, एक रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

हिंगोलीत ४२ जवान कोरोनाने बाधित

हिंगोलीमधील राज्य राखीव दलाच्या आणखीन एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे,आतापर्यंत एकूण ४२ जवान कोरोनाने बाधित आहेत. तर, यापैकी ४ जवान हे औरंगाबाद इथे उपचार घेत आहेत.  यामुळे, हिंगोलीत एकूण ४७ रूग्ण हे कोरोनाबाधित आहेत. 

 कराडमध्येही कोरोनाचा कहर

साताऱ्यातल्या कराडमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. शुक्रवारच्या दिवसात आणखी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात एका दिवसात २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडलीय. कराडमध्ये एका दिवसात २४ आणि साताऱ्यात १ रुग्ण वाढलाय. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे.