मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मुंबई, पुण्यासह प्रमुख मोठ्या शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. मुंबईला पाणीप्रुरवठा करणारी चारही धरणे भरली आहेत. तर पुणे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने येथीलही पाणीप्रश्न सुटला आहे. दरम्यान, आज मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसेल तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Increase in water for this dam in Maharashtra)
कोयना धरणातून 50 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीत सध्या 11 फूट असणारी कृष्णा नदीची पाणीपातळी 25 फूटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातूनही 8 हजार 205 क्युसेस पाणी वारणा नदीत सोडलं जातंय. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. पंचगंगा नदीच पाणी यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यादा पात्राबाहेर गेलंय.. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होते का असा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरलंय..धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत.
नाशिकच्या गंगापूर धरणातून चार हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय. मात्र शहरातल्या होळकर पुलाजवळ विसर्ग साडेसहा हजाराच्या जवळपास पोहोचलाय. त्यामुळे पंचवटीतील कुंभमेळ्यासाठी ओळखला जाणारा रामकुंड परिसर बहुतांशी पाण्याखाली गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या 72 तासापासून दमदार पाऊस सुरू आहे. रात्रीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाशिकच्या सहा धरणातून जल विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून अजूनही तीन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे शहरातील गोदावरी काठावर आपत्कालीन जवान तैनात करण्यात आलेत.
मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी नाशिक जिल्ह्यातून. निफाड तालुक्यातल्या नांदूर-मधमेश्वर धरणातून गोदावरीत 20हजार 823 क्युसेक वेगानं विसर्ग सुरु आहे. पाच वक्रकार गेटमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग सुरु आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील डिंभे आणि जुन्नर तालुक्यातील वडज ही दोन्ही धरणे भरलीयत. दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. डिंभेतून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीत सुरूय. तर वडजमधून मिना नदीत १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावरील धनेगाव पम्पिंग स्टेशनमधला तांत्रिक बिघाड दूर केला गेला. यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती पालिकेने दिली. बिघाडामुळे ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा दोन दिवसांपासून खंडित होता. मांजरा धरणात सध्या सुमारे 92 टक्के पाणीसाठा आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल.
यवतमाळ जिल्ह्यातल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पाणीसाठा वाढला. त्यामुळे इसापूर धरणाचे 2 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आलेत. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे इसापूर धरण 98.51 टक्के क्षमतेने भरलंय. धरणातून 38.912 क्युसेक पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.