वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : (International women`s day 2023) कधीकधी काहीजणांचे प्रयत्न आपण अगदी सहजपणे नजरेआड करतो. अर्थात बऱ्याचदा ही कृती जाणीवपूर्वक केलेली नसते. पण, अजाणतेपणानं हे घडून जातं. वास्तव दाहक असलं तरीही ते खरं आहे. कारण, आजही अनेकदा महिलांचं योगदान आणि त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित राहतात. बड्या Corporate कंपन्यांपासून सर्वत्र काही अंशी हा प्रकार पाहायला मिळतो. पण, महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथल्या महिलांनी अशी कमाल केली आहे की या गावाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. (Maharashtra News)
लातूरमधील (Latur) निलंगा (Nilanga) तालुक्यातील आनंदवाडी (गौर) या गावांमध्ये महिलांचंच वर्चस्व असतं. हे या अर्थी म्हटलं जात आहे कारण, ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व सदस्य सर्व महिला असून, या गावातील सर्व प्रमुख पदांवर महिलांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महिलांनाच प्रतिनिधित्व देऊन ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून राज्यात या गावानं एक आदर्श निर्माण केला आहे. (International womens day 2023 Latur nilanga anandwadi village has an administration run by women)
राज्य शासनाचे (Maharashtra State Government) विविध पुरस्कार या गावाला मिळाले आहेत. या गावांमधील प्रत्येक घर हे महिलांच्याच नावावर असून दारावरील नावाची पाटीवरही घरच्या लक्ष्मीचं नाव आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात महिला सरपंच म्हणून भाग्यश्री चामे यांनी गावात अनेक शासकीय योजना आणून उत्कृष्ट काम करत गावकऱ्यांच्या हिताचाच विचार केला आहे.
घरदार सांभाळून, मुलाबाळांचं संगोपन करून अनेक ग्रामविकास योजना आपल्या गावाला कशा फायद्याच्या ठरतील, गावचा सर्वांगीण विकास कसा होईल हाच या महिलांचा मुख्य हेतू असतो. अतिशय सुरेखपणे त्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडत असतात. मग ते गृहलक्ष्मी म्हणन घर सांभाळणं असो किंवा कर्तव्यदक्षता राखत ग्रामपंतायतीचा आणि पर्यायी गावका कारभार सांभाळणं असो.
तुमच्याआमच्या आजुबाजूला असणाऱ्या अशा सर्व कर्तबगार महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!!!