Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेलाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अजूनही 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत. आजच्या दिवसाचं शोधकार्य (Resque Operation) थांबवण्यात आलंय. जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येतायत तसंच दुर्गम डोंगराळ भाग असल्यानं कुठलीही मशिनरी पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळा भार मनुष्यबळावरच आहे. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी एवढ्या उंचावर साहित्य, साधनासामुग्री नेत मदतकार्य सुरुच ठेवलंय. बचावकार्यात NDRF आणि TDRFच्या जवावांबरोबरच स्थानिक ग्रामस्थ आणि हायकर्सचंही मोलाची भूमिका बजावतायत. पनवेलमधील निसर्ग मित्र (Nisarga Mitra) या संस्थेचे 15 स्वयंसेवक बचावकार्यात सहभागी झाले आहेत.
निसर्गमित्रची मदत
निसर्ग मित्रच्या स्वयंसेवकांनी कठिण परिस्थितीतही चार जखमींना डोंगरावरुन खाली उतरवत Ambulance पर्यंत आणलं. दुर्घटनेत एका तरुणाच्या पाठिचा कणा मोडला होता. तर एक महिलेचं डोक्या जबर दुखापत झाली होती. निसर्ग मित्रच्या सचिन शिंदे, पराग सरोदे, हेमंत वैद्य, राहुल खोत, शुभम शिंदे, रुद्र शिंदे आणि धनंजय मदन या तरुणांनी जीवाची पर्वा न करता जखमींनी दुर्घटनास्थळावरुन सुखरुप डोंगराच्या पायथ्याशी आणलं. याठिकाणी यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड, अभिजित घरत आणि यशवंती हायकर्सचे महेंद्र भंडारे यांनी नियोजन करत सर्व जखमींना अॅम्ब्युलन्सने रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. यशवंती हायकर्सच्या शिलेदारांनी प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी पोहोचून बचावकार्यातही मदत केली.
पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरं गाडली गेली होती. अवघड चढण आणि निसरडा रस्ता अशा परिस्थितीही निसर्गमित्र आणि यशवंती हायकर्सच्या तरुणांनी बचावकार्य सुरु ठेवलं. केवळ माणसांच नाही तर गुरंढोरांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढलं.
इरसालवाडी दुर्घटना - पनवेलच्या निसर्ग मित्र संस्थेची बचावकार्यात मदत pic.twitter.com/BO39QB5DbV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2023
रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे इथले ग्रामस्थ, विविध विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच लोकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहुन 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत. गावकऱ्यांनी स्वतःहून दुर्घटनाग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर सामुग्री पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
पोलिसही मदतीला
इरसालवाडीच्या दरडग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झालाय. रायगड पोलिसही या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलेत. सध्या या दरडग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था नानिवली अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेत करण्यात आलीये. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या बेघर ग्रामस्थांना धीर देत आहेत. तसंच त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहेत.