मोठी बातमी: कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा खटला लढवणार

कपिल सिब्बल यांनी हा खटला लढावा, यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. 

Updated: Jul 11, 2020, 07:33 PM IST
मोठी बातमी: कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा खटला लढवणार title=

मुंबई: राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण वैध न्यायालयात वैध ठरवण्यासाठी महाविकासआघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील हा खटला लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकिलांची फौज उतरवण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करताना दिसतील. 

मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात मांडताना सर्वांना विश्वासात घेणार- अशोक चव्हाण

यापूर्वी राज्य सरकारने हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती केली होती. यांच्या जोडीला आता कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादाही हा खटला लढवणार आहेत. कपिल सिब्बल यांनी हा खटला लढावा, यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सकाळीच  मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांनी मराठा आरक्षण उपसमितीशी चर्चा केली. 

माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे - छत्रपती संभाजीराजे

यापूर्वी विरोधकांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, अशोक चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले होते.