अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : गुन्हेगारी विश्वात चोर राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपलू या अट्टल चोराला पुणे पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून घरफोड्यांचे तब्बल ५२ गुन्हे उघडकीस आलेत. फक्त दिवसा घरफोड्या करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
राजेश राम पपलू हे त्याच खरं नाव, पण त्याला या नावानं कोणी ओळखतच नाही. सर्वत्र तो चोर राजा म्हणुनच प्रसिद्ध आहे. आज त्याच वय ३१ वर्षांचं आहे. पुण्यातील हडपसर परिसरात तो राहतो. आई वडील गेल्यांनतर वयाच्या ७ वर्षी त्यानं पहिली चोरी केली. आजवर त्याचा हा उद्योग सुरूच आहे.
यापूर्वी त्याला अनेकदा अटक झालीय. फेब्रुवारी २०१६ मध्ये तो कोठडीतून बाहेर आला होता. आता शहरातील घरफोड्या वाढल्या तसा तो पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याच्याकडून तब्बल १६१ तोळे सोनं जप्त करण्यात आलय. त्याच्या मित्रांनी त्याला चोर राजा अशी सन्माननीय उपाधी दिलीय.
चोर राजा फक्त १० ते ५ या वेळेत घरफोडी करतो. प्रत्येकवेळी त्याचे साथीदार बदलले असतात. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशाच ठिकाणी तो चोरी करतो. जास्तीत जास्त २० मिनिटांत त्याचा कार्यभाग उरकतो. असं असलं तरी आता त्याला जेरबंद करण्यात आलय. चालू वर्षात शहरातील घरफोड्यांना आळा घालण्यात तसेच घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
चोर राजानं आजवर २२ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या केल्या आहेत. चौकशीमध्ये त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांची ही कामगिरी निश्चितपणे उल्लेखनीय आहे. मात्र तितकीच उल्लेखनीय चोर राजाची कारकीर्द आहे.