प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमी झालेत. वारंवार मदतीसाठी याचना केल्यानंतरही प्रशासनाकडून वेळीच मदत उपलब्ध झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.
रात्री दोन वाजले तरीही मदतीसाठी क्रेन पोहचली नव्हती... अत्यंत अडगळीच्या रस्त्यावर स्थानिक रहिवासी कोणत्याही मदतीशिवाय मदतीचा प्रयत्न करत होते. अपघातानंतर तब्बल तीन तासानंतर ही गाडी क्रेनच्या साहाय्यानं पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं.
१७ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर बस गणपतीपुळे इथून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी शहरातील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून टेम्पो ट्रॅव्हलर थेट पंचगंगा नदीत कोसळला.
या गाडीत एकूण १७ जण होते. त्यापैंकी बारा जणांचा मृत्यू झालाय. सर्व मृत हे पुण्यातील बालेवाडी आणि पिरगुंटे इथले रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हे कुटुंबीय परत कोल्हापूरच्या दिशेनं येत होते. हे सर्वजण सुट्टीनिमित्त गणपतपुळेला देवदर्शनाला गेलं होते.
दरम्यान कोल्हापुरातील शिवाजी पूल परिसरात ही टेम्पो ट्रॅव्हलर गाडी आली असता, चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि थेट संरक्षक कठड्याला धडक देऊन नदीत कोसळली. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केलं. घटना रात्री साडे अकराच्या दरम्यान घडली.
मात्र पालिका आणि जिल्हा प्रशासनाचं आपत्ती व्यवस्था मात्र वरातीमागुन घोड्यासारखी घटनास्थळावर पोहचली. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.
- संतोष बबनराव वरखडे, ४५ वर्षे
- गौरी संतोष वरखडे, १६ वर्षे
- ज्ञानेश्वरी संतोष वरखडे, १४ वर्षे
- सचिन भरत केदारी, ३४ वर्षे
- निलम सचिन केदारी, २८ वर्षे
- संस्कृती सचिन केदारी, ८ वर्षे
- सानिध्य सचिन केदारी, ९ महिने
- साहिल दिलीप केदारी, १४ वर्षे
- भावना दिलीप केदारी, ३५ वर्षे
- श्रावनी दिलीप केदारी, ११ वर्षे
- छाया दिनेश नांगरे, ४१ वर्षे
- प्रतिक दिनेश नांगरे, १४ वर्षे
- अज्ञात वाहन चालक, २८ वर्षे
- प्राजक्ता दिनेश नागरे, १८ वर्षे
- मनिषा संतोष वरखडे, ३८ वर्षे
- मंदा भरत केदारी, ५४ वर्षे