Kalyan Dombivali Rain : ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळ पासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंब्र्यात भूस्खलन झाले आहे. यामुळे काही घराचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले आहे. खरबरदारी म्हणून 400 ते 500 जणांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवी जवळ डोंगरावर असलेल्या कैलासगिरी नगर मध्ये सकाळच्या सुमारास अचानक भूस्खलन झाले. यामुळे 4 ते 5 घरांची पडझड झाली आहे. घटनेने घाबरलेल्या स्थानिकांनी तात्काळ घर सोडून इतर ठिकाणी आसरा घेतल्याने त्यांचा जीव वाचला. माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
धुवांधार पाऊस आणि रेड एलर्ट च्या पार्श्वभूमीवर भूस्खलन झल्याने प्रशासनाने कैलास नगर मधील जवळपास 400 ते 500 नागरिकांचे तात्काळ स्थलांतर केलं आहे. अनेकांनी परिसरातील मशिदीत तर काही जणांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केलं आहे.
दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आणि कोणालाही इजा झाली नाही. मुंब्रा येथील डोंगराळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावासाने झालेल्या या घटनेनंतर प्रशासकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ठाणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील मासुंदा तलावात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे
सकाळपासून कल्याण डोंबिवलीला पावसाने झोपडपून काढले. कल्याण पूर्व परिसरातील वालधूनी नदी लगत असलेल्या शिवाजीनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरलं. वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदी किनारी असलेल्या नागरीकांच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याची घटना घडली. महापालिकेच्या आपतकालीन विभागानं या परिसरातील 150 कुटुंबांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. वालधूनी नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरीक करीत आहेत. मात्र त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरीकांनी केलाय केला आहे
कल्याण ग्रामीण भागातील आडीवली ढोकळी परिसरात पाणी साचल्याने कुणाल पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नागरीकांना दोरीच्या सहाय्याने पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे अनेक इमारती मध्ये देखील पाणी साचल्याने नागरिकांच स्थळातर करत आहे..
सतत कोसळणा-या पावसामुळे बदलापुरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हासनदी दुथडी भरून वाहत असून इथली चौपाटी पाण्याखाली गेलीय. पावसामुळे बदलापुरात जनजीवन विस्कळीत झालं असून पावसामुळे अनेक नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत.
सततच्या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्यानं ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. त्यामुळे पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केलीय.