शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 'हे' असणार नवीन उत्तराधिकारी

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याबाबत अफवा पसरल्याने अहमदपूरच्या भक्तीस्थळावर भक्तांनी एकच गर्दी केली. 

Updated: Aug 29, 2020, 07:31 PM IST
 शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 'हे' असणार नवीन उत्तराधिकारी

लातूर :  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याबाबत अफवा पसरल्याने अहमदपूरच्या भक्तीस्थळावर भक्तांनी एकच गर्दी केली. याचे व्हिडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल झालेत. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, त्यांचे दोन उत्तराधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

 अफवा पसरली आणि गर्दी लोटली 

 महाराजांच्या  जिवंत समाधीच्या मुद्द्यावरून काल गोंधळ निर्माण झाला. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या मठाच्या संपत्तीवरून होत असून महाराजांच्या आत्महत्येचेच षडयंत्र केल्याचा आरोप शिवा वीरशैव संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केला आहे. त्यानंतर मुळात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे स्वतः अविवाहित असल्यामुळे त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ मन्मथ स्वामी यांच्या नातवांना उत्तराधिकारी जाहीर केले आहे.

लातूरमध्ये महाराजांबद्दल अफवा पसरली आणि गर्दी लोटली, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा

 ज्यात अहमदपूरच्या मठावर त्यांच्या सख्ख्या भावाचा १० वर्षीय नातू राजशेखर विश्वंभर स्वामी यांना उत्तराधिकारी केले आहे. तर अहमदपूर तालुक्यातील हडोळती मठावर दुसरे १७ वर्षीय नातू अभिषेक राजकुमार स्वामी यांना महाराजांनी रुग्णालयात जाण्यापूर्वीच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. अहमदपूर येथील मठाची, भक्ती स्थळाची जमीन जवळपास १८ एकर इतकी आहे तर हडोळती मठाची ३० ते ३५ एकर जमीन आहे. 

मुळात महाराजांचे क्रमांक दोनचे पुतणे गुरुराज स्वामी तथा बदक महाराज यांचा पट्टाभिषेक झाला होता. तेच उत्तराधिकारी होणार असल्यामुळे ते अद्याप अविवाहित होते. मात्र अचानक दोन नवे उत्तराधिकारी कसे, अशी चर्चा अहमदपूरमध्ये दिवसभर सुरू आहे. मठाच्या संपत्तीच्या वादावरूनच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जिवंत समाधीची चर्चा पेरल्याचेही बोलले जात आहे.