नितीन पाटणकर / पुणे : भाजपचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. भाजपच्या डोके दुखीत वाढ झाली आहे. कारण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी भाजपला मतदान करू नका, असे आवाहन केले आहे. बाबा आढाव यांच्या भूमिकेचा भाजपला पुण्यात फटका बसू शकतो, अशा चर्चा आता रंगू लागली आहे.
भाजप सरकारने कष्टकऱ्यांचा घास पळवण्याचे काम केले आहे. रिक्षा चालकांना रिक्षाचं पासिंग करणे अशक्य झाले आहे. कष्टाची भाकरी केंद्राचा धान्य पुरवठा भाजप सरकारने बंद केला आहे, असा भाजपवर घाणागती हल्ला बाबा आढाव यांनी चढवला आहे. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांनी भाजपला मतदान करु नका, असे आवाहन केले आहे. भाजपवर बाबा आढाव यांनी फक्त आरोपांच्याच फैरी झाडलेल्या नाहीत. तर, कष्टकऱ्यांनी भाजपला मत देऊ नये, असेही आवाहन केलं आहे.
दरम्यान, बाबा आढाव भाजवर टीका करुन थांबले नाही तर त्याही पुढं जाऊन त्यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. आणि ते त्यांचा प्रचारही करणार आहेत. याची माहिती खुद्द हमाल पंचायत अध्यक्ष बाबा आढाव यांनी दिली आहे. बाबा आढाव यांचा विशेष रोष आहे तो भाजपचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट यांच्यावर. कारण, गरिब - कष्टकरी यांच्यासाठी कष्टाची भाकरी केंद्र चालवली जातात. त्यासाठी होणारा स्वस्त धान्य पुरवठा थांबवण्यात आला आहे. गिरीश बापट मंत्री असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला, असा आरोप करणयात आलाय. भाजपला मात्र हे आरोप मान्य नाहीत. उलट भाजपच्या सरकारमुळे रिक्षा चालकांचा पंधरा वर्षांचा परवाना पंचवीस वर्षांचा झाला आहे. कष्टकरणाऱ्या जनतेचं जगणं अधिक सुखकर झाले आहे, असे भाजपचे म्हणणं आहे. बाबा आढावासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यानं अशी भुमिका घेणं भाजपला पटलेले नाही, असे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे.
भाजपने बाबा आढाव यांच्या भूमिकेचा प्रतिवाद केला असला तरी, पुण्यात भाजपच्या अडचणी वाढणार. हे निश्चित आहे. मात्र, बाबा आढाव यांच्या सारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने भाजप विरोधात उघड भूमिका घेतल्यानं राज्यातही भाजपला कष्टकरी समाजाच्या नाराजीचा फटका बसू शकतो.