मुक्ताई नगर : भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि विद्यमान उमेदवार रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर येथे संत मुक्ताई मंदीर प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री प्रकृती अस्वस्थामुळे एकनाथ खडसे सभेला उपस्थित नव्हते. मात्र एकनाथ खडसे यांनी भ्रमणध्वनी वरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी मंचावर असलेल्या रक्षा खडसे या भावूक झालेल्या दिसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.
गेल्या काही दिवसात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. या मतदार संघातून रक्षा खडसे यांना भक्कम पाठींबा दिसून येत आहे. रक्षा या 2010 पासूनच सक्रिय राजकारणात आहेत. 2013 मध्ये रक्षा खडसे यांचे पती निखील खडसे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हा खडसे कुटुंबाला मोठा धक्का होता. यातून सावरत रक्षा खडसे या पतीच्या जागी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या. रक्षा यांचा तगडा जनसंपर्क हीच त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यांच्यावर विश्वास दाखवत सासरे एकनाथ खडसे यांनी रक्षा यांना थेट लोकसभेवर पाठवले.
आपण लोकसभेतील एकमेव अशा खासदार आहोत ज्या कोणाच्या तरी सून आहोत. अन्यथा कोणाची तरी पत्नी किंवा मुलगी याच खासदार म्हणून येत असतात असे रक्षा यांनी एका मुलाखतीत सांगितले. होते. एकनाथ खडसे सध्या उपचारासाठी मुंबईत आहेत. त्यामुळे भाजपाच्या मुक्ताई नगर येथील प्रचाराला ते उपस्थित राहू शकले नाहीत. पण मोबाईल वरून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंचावर असलेल्या रक्षा खडसे भावूक झालेल्या दिसल्या.
२०१४ च्या निवडणुकीत तत्कालिन खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध घेत, एकनाथ खडसेंनी त्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. मोदी लाटेत रक्षा खडसे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा ३ लाख १८ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले.