Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? पाहुया स्पेशल रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Mar 6, 2024, 09:09 PM IST
Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत title=
Lok Sabha Election 2024 Baramati Constituency Wise Details in Marathi

Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Ajit Pawar: मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे घेत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय.

तर बारामतीत काका पुतण्याची ताकद किती याच्याच अंदाज घेणं सुरू झालंय. अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.  गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला. परंतु अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठिमागे उभे राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधला असताना अजित पवारांचे बंड व पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह मतदार लोकसभा मतदारसंघात देखील मोठी विकासकामे केले आहेत त्यामुळेच मी दौंडला आले आहे बाकी तुम्ही समजून घ्या, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. तर ही लोकशाही आहे यामध्ये प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे माझी भाजपशी वैचारिक लढाई आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

बारामतीचं गणित कसं?

बारामती लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघाचे ६ मतदार संघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे बारामतीत अजित पवार आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणे, काँग्रेस पक्षाचे भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप भाजपचे दौंडचे राहुल कुल आणि खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तापकीर असे आमदार आहेत. 

सुप्रिया सुळे गड राखणार?

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे महाराष्ट्रातून एक नंबरने विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते तर सुप्रिया सुळे यांनाही बारामतीतून विक्रमी मतदान मिळाले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले मात्र आता अजित पवार शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर अजित पवार यांचे मताधिक्य आणखीन वाढणार आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघात समसमान मतदान मिळेल. दौंडचे भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

कोण कोणाच्या बाजूने?

दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर स्वतः अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करतील तर संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतील का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. आमदार संजय जगताप हे अजित पवारांमूळ निवडून आले आहेत तर संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या दुफळीमुळे राज्यात, जिल्ह्यात आणि गावागावात राष्ट्रवादी काँगेस मध्ये फूट पडलीये. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुप्रिया सुळे यांचे लोकसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.