Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिले. आपल्याला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती आपण दिल्लीतील वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. मात्र फडणवीसांनी हा राजीनामा देण्याच्या आधीच ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेनेच घरी पाठवलं असून ते राजीनामा काय देत आहेत? असा खोचक सवाल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारण रसातळाला नेलं, महाराष्ट्रात सूडाचं राजकारण सुरु केलं, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
"हा नेता दिल्लीतही चांगलं काम करेल अशी आमच्या महाराष्ट्र अभिमानी लोकांची अपेक्षा होता. मात्र ज्या पद्धतीचं सूडाचं, दळभद्री आणि कपटाचं राजकारण पुढल्या काळामध्ये फडणवीस यांनी केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता ज्यात राजकीय सभ्यता, संस्कृती होती त्याचा नाश करण्याचं काम केलं," अशा कठोर शब्दांमध्ये राऊत यांनी टीका केली आहे. "काल मी म्हणालो त्याप्रमाणे पेशवेकाळात आनंदीबाई होत्या. त्यांची लोक ज्यासाठी आठवण काढतात. तसं फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत," असंही राऊत म्हणाले.
"आमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या कटुतेसाठी ते स्वत: कारण आहे. महाराष्ट्रात सूडाचं आणि बदल्याचं राजकारण फडणवीसांनी सुरु केलं. ते यापूर्वी कधीच नव्हतं. त्याचा बदला लोकांनी या लोकसभा निवडणुकीत मिळाली. लोकांना संधी मिळाली आणि त्यांनी फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण आहे. बदल्याचं, सूडाचं, महाराष्ट्राचं विनाश करणारं. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आता त्यांचे चमचे धावत आहेत मागे पुढे ते सर्वजण महाराष्ट्राचे शत्रू आहेत. दुर्देवाने मराठी माणसं आहेत. अशी माणसं महाराष्ट्राला विरोध करणारी माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही होती. अशीच माणसं फडणवीसांच्या मागे शेपटी हलवत फिरत आहेत. मी अत्यंत कटुतेने बोलतोय," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
"महाराष्ट्रातील राजकारणाची एक पिढी संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं. हातातील सत्ता चुकीच्या कामासाठी वापरली. राजकीय कार्यकर्त्यांचा सूड घेण्यासाठी सत्ता वापरली. न्यायालयात दबाव आणला. न्यायमूर्तींना घरी बोलावून दम देण्यात आला. निरोप पाठवून घरी बोलावून न्यायमूर्तींना धमकावण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या या टोळीनं केलं आहे," असंही राऊत म्हणालेत.
नक्की वाचा >> 'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'
"फडणवीसांनी पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी केला. या सर्वाचा उद्रेक कुठेतरी होतोच. आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत देवेंद्र फडणवीस! लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्रातील लोकांचा फडणवीसांवर आहे. विदर्भात काय झालं? विदर्भात गडकरींचा जागा सोडली तर फडणवीस यांचा भाजपा रसातळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना? तुम्ही कसला राजीनामा देताय? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जातीचं, धर्माचं, सूडाचं राजकारण त्यांनी सुरु केलं. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं. लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललं आहे ते पाहा. आमच्यावर कारवाया केल्या. भविष्यात आम्हालाही कारवाया करता येतील. तेवढे पुरावे आमच्याकडे आहेत. आमची खदखद समजून घ्या. तुम्ही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना जाऊन भेटा. इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. महानगरपालिकेत खोट्या कारवाया करायला लावल्या. महापालिका अधिकारी, समाजिक कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यांच्या कुटुंबांचा छळ केला. म्हणून राज्याने तुमच्याही रडायची वेळ आणली," अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.
नक्की वाचा >> 'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'
"कालपर्यंत मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन. जे दोन पक्ष त्यांनी फोडले त्या दोन पक्षांनीच तुमच्यावर आश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस, हे विसरु नका! अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला या राज्यात पाहायच्या आहेत. अजून विधानसबा यायच्या आहेत. महानगरपालिका यायच्या आहेत. तुम्ही स्वत:ला पक्ष कार्यात गुंतवून घेणार आहात ना? तुम्ही जे कराल ते कराल पण महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षराने लिहिलं जाईल, हे मी आता तुम्हाला परफेक्ट सांगतो. तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली. मराठी माणसाच्या स्वाभीमानाची वाट लावली. बाळासाहेबांची शिवसेना फोडली याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर सातत्याने घेत राहील," असं राऊत म्हणाले.