Loksabha Election 2024 : काही दिवसांतच (Holi) होळी आणि त्यामागोमाग गुढीपाडवा (Gudhi Padwa) असे सणवार तोंडावर आलेले असतानाच राज्यात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळं राज्याचीस दुर्बल घटकांवर याचा परिणाम होताना दिसणार आहे. कारण, पुढील किमान दोन महिन्यांसाठी राज्यात आनंदाचा शिधा वाटप योजना बंद असेल. आगामी निवडणूक आणि त्या धर्तीवर लागू झालेल्या आचारसंहितेच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
होळी, गुढीपाडवा या सणांच्या निमित्तानं राज्यात आनंदाचा शिधा वाटप करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं होतं. पण, या नियोजनापुढे आता आचारसंहितेमुळं अडचणी उभ्या राहिल्याचं स्पष्ट होत आहे.
(CM Eknath Shinde) राज्य शासनानं समाजातील सामान्य नागरिकांसह दुर्बल घटकांना शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारी सामग्री आणि अत्यावश्यक साहित्य किरकोळ दरानं उपलब्ध करून देत त्याचं वाटप करण्याची योजना आखत त्याची अंमलबजावणीही सुरु केली होती.
साधारण दीड वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाच्या वतीनं 100 रुपये आकारून त्यात एक किलो साखर, अर्धा किलो रवा, मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा या उपक्रमाअंतर्गत शिधावाटप दुकानातून लाभार्थींपर्यंत या वस्तू पोहोचवण्यात येत होत्या. आतापर्यंत सणासुदीच्या काळात हा शिधा वाटप केला जात होता.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानंही हे शिधावाटप होणं अपेक्षित होतं. पण, देशात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लाभार्थींना शिधावाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचं वाटप आचारसंहिता संपेपर्यंत म्हणजेच 7 जून 2024 वाटप न करण्याचा निर्णय शासनाकडून घेतला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाल्यामुळं आता हा आनंदाचा शिधा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. आचारसंहितेअंतर्गत पिशव्या, साड्या, शिधा वाटप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.