Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान आणि कमाल तापमानाचा एकंदर आकडा पाहता राज्यातून आता थंडी धीम्या गतीनं काढता पाय घेत असल्याची चित्र पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही हिवाळ्याच्या निरोपाचा क्षण मात्र अद्यापही दूर आहे हे नाकारता येत नाही.
मागील 24 तासांपासून राज्यात किनारपट्टी क्षेत्रामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं असून, कोकण, मुंबई, नवी मुंबई इथं दुपारच्या वेळी उष्मा अधिक प्रमाणात जाणवला. तर, विदर्भात पावसाचं सावट पाहायला मिळालं. राज्यात येत्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरणाचं वर्चस्व पाहायला मिळणार असून, विदर्भासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान किमान तापमानातही 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिथं पुण्यात बुधवारी रात्री काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. धनकवडी परिसरात बुधवारी रात्री पावसाच्या अचानक सरी आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राज्याची हे हवामान बदल पाहता पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतानाच एकाएकी पावसाच्या सरींचीही हजेरी असल्यामुळं मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या सरींचा मारा, पर्वतीय क्षेत्रामध्ये हिमवृष्टी असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या पंजाब आणि लगतच्या पाकिस्तानकडील क्षेत्रावर सक्रिय चक्राकार वाऱ्यांमुळं देशाच्या उत्तरेकडेसुद्धा पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. तर, दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाच्या जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे.
आएमडीच्या माहितीनुसार पश्चिम हिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असून, त्यामुळं पुढील चार ते पाच दिवस जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे. प्रामुख्यानं विदर्भात याचे सर्वाधिक परिणाम दिसणार असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडं असेल.