चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरात वाहनाच्या पार्किंगवरून झालेल्या वादात बाहेरून गुंड मागवून कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही बाब वयोवृद्ध वडिलांनी डोळ्यासमोर पाहिली आणि घाबरलेल्या वडिलांचा रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. असं असतानाही उलट वडील गमावलेल्या कुटुंबाच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवसेना नगरसेवकाच्या मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं प्रकरण समोर आल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलं आहे.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनी भागात सिंग सभा पंचायती गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारासमोरील गल्लीत तिथं राहणाऱ्या रहिवाश्यांच्या कार पार्क केल्या जातात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास करतार सिंग हे चारचाकी कार घेऊन गेले. प्रितपाल सिंग यांच्या दोन कार चुकीच्या पद्धतीने पार्क केल्या असल्याने करतार यांनी प्रीतपाल यांच्या घराच्या दरवाजा वाजवून कारची चावी मागितली. मात्र प्रीतपाल यांनी दारूच्या नशेत वाद घालत करतार याना लाथ मारली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद झाले. हे वाद सोडविण्यासाठी काहीच वेळात शिवसेना माजी नगरसेवक कलवंत सिंग सोहता उर्फ बिट्टू भाई आणि गुंड प्रवृत्तीच्या बिल्ला, हनी सरदार यांच्यासह 10 ते 15 जणांना प्रीतपाल याने बोलावलं. या सर्वांनी वाद सोडवण्याऐवजी करतार आणि त्यांचा मुलगा कुलदीप याला बेदम मारहाण केली.
ही सर्व घटना करतार यांचे वयोवृद्ध वडील रांझा सिंग यांनी पाहिली. यामुळे धास्तावलेल्या रांझा सिंग यांचा रक्तदाब वाढून त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. करतार सिंग यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांसमोर मारहाण झाली असतानाही पोलिसांनी उलट करतार सिंग यांच्याच कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला. वडिलांच्या दुःखातून बाहेर पडल्यावर आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाल्याचं समजताच करतार यांनी मध्यवर्ती पोलीस स्टेशन गाठलं, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्यानं त्यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.